गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

वादळ

मनातलं वादळ पायाने शमवण्यासाठी ती बाहेर पडली खरी. पण ती कुठे चालली आहे, कशासाठी चालत आहे तिचा तिलाच  कळत नव्हत. वाट, मन सगळंच अंधारात हरवलं होत.
इतक्या सुंदर निसर्ग रम्य ठिकाणी येऊन ही  तिला त्याचा आनंद घेता येत नव्हता. आपल्याच विचारांमध्ये हरवून ती कधी समुद्रावर पोचली तिला तिचही कळल नाही. त्याची आठवण मनाला सारखी स्पर्श करून जात होती. इथे तो आज असायला हवा होता.
तो का नाही फोन उचलत आहे, का तिच्या कुठल्याच SMS ला उत्तर नाही पाठवत हे अगदी बुद्धीच्या पलीकडच होत. काय चालल आहे त्याच्या मनात? काय वाटत आहे त्याला? त्याला माझ्यापासून दूर जायचा आहे का? मग तो मला का नाही हे स्पष्ट सांगून टाकत? ते जास्त बर नाही का? असा दोघांनी हि अधांतरी कुठे तरी तरंगत राहायचं, काहीतरी निष्कर्ष काढत रहायचे, स्वतःच मनावरची खपली काढायची, स्वतःच त्यावर मलमपट्टी करायची, सारख स्वतःला स्वतःच्या ताब्यात ठेवायचं या सगळ्याचा खूप कंटाळा आला.
माझी काळजी घ्यायला कोणी तरी माझं हवं, अस तिला अलीकडे फार वाटायला लागल होत. अनेक वर्षांनी तो तिला या रुपात भेटला आणि ती तिचं सर्वस्व त्याला देऊन बसली. या आयुष्याच्या वळणावर कोणी तरी भेटेल अस तिला कधीच वाटलं नव्हतं. मुलं आपापल्या वाटेला लागली आणि ती जास्तच एकटी पडली. उमेदीची अनेक वर्ष एकटीच काढलेली असली तरी तेव्हा अनेक उदयोग असायचे.  ऑफीस,नाटकात काम, गाण, लिखाण, मुलांचे व्याप- एक कि दोन! त्या उमेदीच्या काळात अनेक पुरुष आयुष्यात आले.  वेगवेगळ्या रुपात. कधी लेबल असलेली कधी लेबल नसलेली नाती. कधी अट्टाहासाने तिने काहीना दूर लोटलं तर बर्याच  जणांनी तिला.
भावनांचं ओझ पाठीशी टाकून आपण चालत राहिलो. कधीच कोणाकडे तक्रार नाही केली एकट असण्याची. मुलांकडे ही नाही. त्यांना आपण एकट्यानेच वाढवल याची हि कधी जाणीव नाही करून दिली. आलेला प्रत्येक दिवसा नव्याने साजरा केला. मग आता हि घुसमट का? काय हव आहे मला? एक आधार, एक मायेचा स्पर्श, एक प्रेमाची उब? माझ म्हणता येईल असं एक माझ माणूस ? पण त्याला मी तेवढी हक्काची, त्याची वाटते का? त्याला खरच माझ्या बद्दल काही वाटत?
विचार करत करत ती वाळूवर बसली. समुद्राच्या लाटा कधी जवळ येऊन तिला स्पर्श करत होत्या तर कधी लांबूनच परतत होत्या. त्याचा मनातही अशाच  लाटा येत असाव्यात का?
त्याच्या   मनाचं  अस प्रतिबिंब पाहून  ती हरखून  गेली  आणि  त्याच्या जवळ जाण्यासाठी अजून थोडी समुद्रात चालत गेली आणि मग तिथे आत जाऊन तिने परत एकदा समाधी लावली . त्याच्या  जवळ असण्याचं  एक अद्भुत समाधान तिच्या चेहर्यावर विलसत राहीलं .

1 टिप्पणी: