बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

कोपरे

एक हळवा कोपरा
दुःखानं भरलेला
प्रेम नाकारलं जाऊन
अबोल बसलेला

एक अव्यक्त कोपरा
स्वतःमध्येच बुडलेला
मनाशीच व्यक्त होत
आत कुढत बसलेला

एक अबोल कोपरा
सगळं बोलणं ऐकणं नाकारलेला
कोणालाच न सांगत
मूक बसलेला

या सगळ्या कोपऱ्यांना सांभाळत
भांबावून गेलेली मी
बघते आहे कोणत्या
कोपऱ्यात फिरून
मन परत येतं आहे

मंगळवार, ३१ मे, २०२२

माणुसकी

 भूतकाळाचे संदर्भ 

वर्तमानात सतावत राहिले 

मी माणूस म्हणून तरीही 

जगत राहिले,

सुखदुःखाच्या पलिकडे 

गेलेलं मन

वर्तमानाशी दुवा जोडत राहिलं 

याहीकडे मी 

माणुसकीच्या नजरेनं पाहिलं,

माझी माणुसकी जपल्याबद्दल 

तुझे खूप खूप आभार 

नाहीतर मी भूतकाळाबरोबर 

माणुसकी हरवून बसले असते


सोमवार, ४ एप्रिल, २०२२

प्रवास

 गुंतू नकोस पुढे जा
अडकू नकोस स्वतंत्र हो
माणूस म्हणून जग आणि माणूस म्हणून वाग
दुसर्यांनाही स्वतंत्र कर

निघून जाऊ दे अहंकार
गळून पडू दे मी पण
माणूस म्हणून जग आणि माणूस म्हणून वाग
दुसर्यांनाही स्वतंत्र कर

तुझा प्रवास स्वतंत्र अन त्यांचाही
तुझा प्रवास अनंतापर्यतचा अन त्यांचाही
एकटी एकटी चालत जा एकटीनेच स्वतंत्र हो
माणूस म्हणून जग आणि माणूस म्हणून वाग
दुसर्यांनाही स्वतंत्र कर