रविवार, ९ जून, २०१३

पिल्लं

पहिली पिल्ल उणीपुरी २ -३ महिन्याची होत आहेत तोपर्यंतच माऊला परत एका बोक्याने साद घातली आणि ती नादाला लागलीच. थोड्याच दिवसात आधीच्या दोन पिलांना तिने  असच सोडून दिल. पिल मोठी झाल्यावर आई  त्यांना सोडून देतेच. प्राण्यांचा  हा निसर्ग नियमच आहे.  एव्हाना पहिली पिल स्व त:च पोट भरण्या इतकी मोठी झाली होती, त्यामुळे मला आणि सायलीला विशेष काही वाटल नाही.
अधून मधून माऊ दिसत होती. तिच्या पोटावरून आम्ही किती दिवस झाले, किती राहिले याचा अंदाज घेत होतो. मांजरांमध्ये साधारण ९० दिवसांनतर बाळ होते.  माऊ आधीच्या पिलांना जवळ हि करत नव्हती त्यामुळे ती परत आमच्याच इथे पिलं  घालेल असा अजिबातच वाटल नव्हत. एके दिवशी माऊ दिसली आणि तीच पोट सपाट झालेलं.
काल  दिपू अचानक सांगत आली - अग माऊ दोन पिलांना वरतीच सोडून  कोठे तरी गायब झाली आहे आणि दोन पिल स्वत:बरोबर घेऊन गेली आहे. खूप ओरडत आहेत ग पिल , काय करायचं? सायली आणि मी पण वर गेलो. बघितल, तर एवढेसे ते छोटे जीव ओरडत होते. त्यांचा आवाज पक्ष्यासारखा येत होता. त्यांनी नुकतेच डोळे उघडले असावेत.ते थंडीने आणि भीतीने थरथर कापत होते. अगदी छोट्या बोटाएवढी होती पिल्ल. एक पिवळसर आणि एक पांढरट पिवळसर.  दिपूने त्यांना  बशीतून दुध पाजायचा प्रयत्न केला होता, पण त्यांना पितच येत नव्हत. मग आम्ही शाईच्या ड्रोपेरने त्यांना दूध  द्यायचा प्रयत्न केला, पण त्याना तेही घेता येत नव्हत. त्याना कापड दुधात भिजवून दिल चोखायला. ते त्यांनी चोखल  पण नक्कीच त्यांना खूप भूक लागली होती आणि आम्ही काहीही करू शकत नव्ह्तो. मग ओळखीच्या सगळ्यांना फोन केले.  काय करता येईल ते पाहिलं, प्राणी मित्र संघटनाना फोन केले. काल रविवार असल्यामुळे सगळ बंद होत. सायलीने फेसबुक वर पोस्ट टाकली. दिपू त्यांच्यासाठी पेट्स वल्ड मधून बाटली घेऊन आली. शेवटी सायलीचे शिवालीकाशी बोलणे झाले.
 तिच्याकडे बरेच प्राणी असल्यामुळे तिला बराच अनुभव आहे. तिने तिच्या प्राण्यांच्या डॉक्टरना फोन केला. शिवालीका आली आणि त्याना बाकस मधून घरी घेऊन गेली. डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे त्याना तिने मध आणि दुध दिले. त्यांचे ओरडणे थांबले पण फार आशा ठेवू नका असा डॉक्टरनी सांगितलं होत. पिल फार नाजूक आहेत आणि त्याना आईचीच ऊब लागते असं डॉक्टर म्हणाले. सकाळी शिवालीकाचा मेसेज आला - रात्री पिल्लं गेली.
मनुष्य प्राण्यांमध्ये आई आपल्या सगळ्यात नाजूक प्रकृतीच्या मुलाला खूप जपते. प्राण्यां मधल्या आईच हे वागण  माझ्या आकलनाच्या पलीकडे होत. कदाचित माऊलाच काहीतरी झाल  असेल अशी माझ्यातल्या आईची मी समजूत काढली.

गुरुवार, ६ जून, २०१३

Asach kahisa

जगणं कसं आहे ? कळल आहे का कधी ? आपलंच आयुष्य उलगडून पाहिलं की स्वत:चा स्वत:मध्येच  इतका गुंता होतो. भूतकाळातही जायची गरज नाही. इतकी नाती, त्याबद्दल असणारी जाणीव, त्या माणसांबद्दल वाटणारी ओढ, आकर्षण, प्रेम. काही वेळा व्यक्त केलेलं खूप वेळ अव्यक्त ठेवलेलं! प्रत्येक आजूबाजूच्या व्यक्तीबद्दल काही न काही ओढ असतेच. त्याशिवाय कोणताच बंध तयार होत नाही. ती व्यक्ती मग तुमची मित्र-मैत्रिण असो, सहकारी असो किंवा तुमचे वरिष्ठ असोत.
या नात्यांचा जसा आनंद मिळतो तसंच काही वेळेला दु:खहि मिळत. नात जवळच झाल की अपेक्षा वाढतात. अस झाल की अपेक्षाभंगाच दु:ख आलच. मग काय करायच? कस जगायचं ? सगळी  कवाडं बंद करून? स्वत:शी भिंत बांधून? अस जगण म्हणजे गुदमरण  नाही का? का नाही आपण कोणाला मोकळेपणाने व्यक्त होऊ शकत? कुठेतरी पोचण  म्हणजेच नात परिपूर्ण झाल असं थोडच आहे? किंवा कुठे  तरी पोचेल म्हणून मैत्री तोडण बरोबर आहे का?
आपण कोणाला तरी आवडतो हि भावना रोज छान रहाण्यासाठी नक्कीच उपयोगी  पडते .
म्हणून कुठे पोचायचं  नसलं तरी मोकळ व्हावं. जगण अर्थपूर्ण बनवावं स्वत:चं आणि आपल्या जवळच्या माणसांचं